मुलगी आहेस, सायन्स शिकून काय करणार ? या एका प्रश्नाने माझे गणिताशी ब्रेक अप झाले . .

मी जेव्हा सहावीत होते तेव्हा मला गणितात शंभरपैकी सात मार्क मिळाले. माझा आत्मविश्वास एकदम कमी झाला. मग मी आणखी एक परीक्षा दिली. रात्री एक वाजेपर्यंत जागून अभ्यास केला.मग चमत्कार घडला. मला शंभरपैकी साठ मार्क मिळाले. त्यानंतर आत्मविश्वास वाढतच गेला. मी सातवीत नीट पास झाले. मग आठवीत मला ७० पेक्षा जास्त मार्क मिळाले. मग मी ठरवले, आता काहीही होवो,११ वीत तर गणित विषयच घ्यायचा आहे.

दहावीत ८५ मार्क मिळाले आणि गणित विषयही. पण तरीही मनात भीती असायची कि आता पूर्वीसारखे कमी मार्क मिळायला नकोत. ही भीती इतकी भयंकर मनात बसून गेली होती की मला वाईट स्वप्ने पडत. स्वप्नात मला असेल दिसायचे की मला परत गणितात ७ मार्क मिळाले आहे किंवा मी गणिताचा पेपर देत आही आणि माझा पेपर सुटला. मला गणितात रुची असूनही सहावीत गणितात सात मार्क मिळाले होते. ११ वि १२ वीतही चांगले मार्क आले नाहीत. मग असे का झाले ?

सजे शिक्षक होते त्यांची पद्धत सदोष होती. मला त्यांचे शिकवणे समजत नसे. त्यांनास्वतःलाच किती येत होते याबद्दल मला शंका होती. आठवीतले शिक्षक चांगले होते म्हणून चांगले मार्क आले. त्यांनी बेसिक चांगले करून घेतले होते. दहावीपर्यंतचे शिक्षक उत्तम होते. मग पुढे चांगले शिक्षक नसल्याने पार वाट लागली.

दुसरे म्हणजे असे की अनेक शाळांत गणित तर शिकविले जायचे पण त्यांच्याकडून घोकंपट्टी करून घेतली जाते. पाढे पाठ करून घेतले जातात. गन्त हा विषय घोकंपट्टीचा नाही. तो समजून घ्यायचा असतो.

तिसरे म्हणजे मला हे कधीच सांगितले गेले नाही की जे बेसिक प्रश्न मी सोडवते आहे त्याचा जीवनात काय उपयोग आहे. जी x ची किंमत मी शोधत होते, त्याने मला काय मिळेल? त्याचा उपयोग कुठे होईल? जर मला हे सांगितले गेले असते तर कदाचित मी आणखी मन लावून अभ्यास केला असता.

चौथीआणि महत्वाची गोष्ट अशी कि मला सगळीकडे सांगितले जायचे की तू मुलगी आहेस तू होमसायन्स घे. गणित घेऊन काय करणार ? हे मुलींसाठी नाही. हे तुला जमणार नाही. याचा माझ्यावर फार परीणाम झाला. जर मला योग्य तो आधार मिळाला असता तर माझे गणिताशी ब्रेक अप झाले नसते.

मुली लहानपणापासूनच हे ऐकतात की तू मुलगी आहेस, काय मिळणार तुला गणित शिकून. याच्या परिणामी आज आयटी क्षेत्रात मुलींची संख्या कमी आहे. या क्षेत्रात जास्तकरून मुलगे दिसून येतात. इतकेच नाही तर इंजिनियरिंग किंवा अन्य क्षेत्रातही मुलींची संख्या कमी दिसून येते कारण त्यांना योग्य असे प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून गणित विषय निवडणार्या मुलींचीही संख्या मुलांच्या तुलनेत फार कमी आहे. अनेक मुलांना खरे तर आयटी मध्ये जायचे नसते किंवा गणित विषय नको असतो पण फक्त मुलगा आहे म्हणून त्याच्या वर प्रेशर दिले जाते आणि आयटी क्षेत्रात जाण्यास भाग पाडले जाते.

गणित हा  एक चांगला विषय आहे. पण त्याचा संबंध इज्ज्तीशी जोडला जातो. मुली हा विषय घेताना दिसत नाहीत आणि मुलगे मात्र केवळ प्रेशरखाली राहून हा विषय घेताना दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *