आणि ..त्याच्या मृत्यूनंतर मित्रांनी फेडलं १४ लाखांचं कर्ज.

असे म्हणतात कि संकटातच खर्या मित्राची परीक्षा होते. मैत्री ही फक्त आयुष्यभरची नव्हे तर खरी मैत्री ही मृत्यूनंतरही निभावली जाते, जपली जाते हे सिद्ध केले आहे सांगलीतील एका मित्रांनी. मित्राच्या मरणानंतरही त्याच्यावर असलेलं थोडंथोडकं नव्हे तर तब्बल १४ लाख रूपयांचं कर्ज सगळ्या मित्रांनी मिळून फेडून त्याला खर्या अर्थाने श्रद्धांजली दिली आहे.

मिरज मधील बेळंकी गावात ही घटना घडली असून या मित्रांनी सर्वांपुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. मित्राच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी सगळे कर्ज फेडून त्यांनी त्यांच्या मैत्रीला खर्या अर्थाने न्याय दिला आहे. राजू सातपुते असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या मित्रांनी हे खूप मोठे कार्य केले आहे. राजू यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी अचानकपणे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. सलगरे गावात ते शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुली , आई आणि वडील असे कुटुंब असून त्यांचे कुटुंब त्यांच्या निधनानंतर जणू शोकसागरात बुडाले. मनाने प्रेमळ असलेले राजू हे समाजात लोकप्रिय होते.


घर बांधण्यासाठी राजू यांनी जवळपास चौदा लाखाचे कर्ज काढले होते. राजूच्या कुटुंबावर हे कर्ज म्हणजे फार मोठे ओझे होते. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन राजू यांच्या मित्रांनी पुढाकार घेऊन, आपापले योगदान देऊन हे कर्ज फेडायचे ठरवले. या कर्जातून राजू आणि त्यांच्या कुटुंबियांना मुक्त करून जणू मैत्रीच्या ऋणातूनच राजू यांना मित्रांनी मुक्त केले आहे.

हे कर्ज वर्षश्राद्धाच्या आधी फेडायचे असे पण केलेल्या मित्रांनी त्यांचा शब्द पाळला आणि कर्ज फेडून त्यानंतर वर्षश्राद्ध पार पाडले. २९ मे ला राजूच्या जाण्यानंतर १ जून २०१८ नंतर या सगळ्या शिक्षक मित्रांनी मदत निधी जमा करत अखेरीस प्रयत्नपूर्वक कर्जाची रक्कम गोळा केली.एका प्रिय मित्राला याहून मोठी श्रद्धांजली ती काय असू शकते ?

मित्रांनो तुम्हाला जर ह्या मित्रांनी त्याच्या मृत्यनंतर हि त्याच्या परिवाराला केलेली मदत आवडली असेल तर शेअर करून तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहचवा .कारण तुमच्या एका शेअर मुळे अनेकांना अशी प्रेरणा मिळेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *